शाहिर सगनभाऊ

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराकमांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भाषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे. तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. पेशवाईच्या काळात वीर रसाबरोबरच, शृंगार रसाचीही शाहिरीमध्ये भर पडली. श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि  दुसरे बाजीराव पेशवेंच्या कालखंडामध्ये शाहिरीला राजाश्रय मिळाला. उत्तर पेशवाईत मराठी शाहिरांच्या प्रतिभेला बहर आला होता. मराठी स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचे चित्रण करणारे लावणी वाङ्मय भरभरून लिहिणारे, अनंतफंदी (इ.स. १७४४ ते १८१९), रामजोशी (इ.स.१७५८ -१८१३ ), शाहीर परशराम (१७५४ -१८४४ ),होनाजी बाळा (१७५४ -१८४४ ),प्रभाकर (१७५२ -१८४३ ) सगनभाऊ (१७७८ -१८५० ) यांच्या जीवनासंबंधी आणि तत्कालीन मराठी भाषेत लिहिलेल्या त्यांच्या लावण्यांविषयी आजतागायत मराठी माणसांच्या मनात कुतूहल आणि आकर्षण आहे.
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहिर, कोणतीही  साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठरले. शाहिर सगनभाऊ मूळचे जेजुरीचे रहिवासी, वंश परंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना आणि काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्यची वाट धरली आणि नामवंत शाहिरांसोबत आपली कवनं सादर करू लागले थोड्याच कालावधीत यश आणि प्रसिद्धी मिळविली.
सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनसुद्धा ते मराठीशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरुप झाले होते, ग्रामीण जीवनशैलीशी त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते.
उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना आणि मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई, या लढाईवर सगनभाऊनी दीर्घ पोवाडा लिहून त्याकाळातील परिस्थितीवर सुंदर भाष्य केले आहे. श्रीखंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.
खडकीच्या लढाईवरील पोवाडा, दुस-या बाजीरावां वरील पोवाडा, पानपतचा पोवाडा हे त्यांचे काही प्रसिध्द पोवाडे, "दळणासारखे किडे रगडले रडती नरनारी । लेकराला माय विसरली, कसा ईश्वर तारी' असे खडकीच्या लढाईनंतर झालेल्या अव्यवस्थेचे वर्णन त्यातील उपमांमुळे प्रभावी ठरते.
होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर असे एकत्रित होनाजी बाळा नाव मिळाले, त्याप्रमाणेच मुस्लीम धर्मीय सगन आणि कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी, हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे नामाभिधान त्याला मिळाल्याची समजूत आहे.
आजही जेजुरीकरांच्या मनामध्ये शाहिर सगनभाऊ यांच्याविषयी आभिमान आहे, दरवर्षी ऑक्टोबर- नोहेंबर महिन्यामध्ये चार दिवसांचा संगीत महोत्सव भरविला जातो. यामध्ये ही रात्र शाहिरांची, रंगल्या रात्री अशा, लोकसंगीत आणि लोकनाट्य असे कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील नामवंत शाहिर आणि कलाकार या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणे हे भाग्याचे समजतात.      श्रीक्षेत्र जेजुरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू असणा-या शाहिर सगनभाऊना www.jejuri.in परिवाराच्या वतीने त्रिवार सलाम....