
अनंत माने यांच्या प्रीतीसंगम चित्रपटाद्वारे त्यांना संपूर्णपणे नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली, या चित्रपटामध्ये त्यांनी छोटीशी भूमिकाही केली आणि अनंत मानेंनी दाखविलेला विश्वास ही सार्थ करून दाखविला.त्यांच्या रुपेरी कारकीर्दीवर पहिली यशाची मोहोर उठविणारा चित्रपट सुद्धा अनंत मानेंनी दिला.


हा चित्रपट पुण्यात विजयानंद थिएटर. मध्ये १३१ आठवडे चालला,अनेक ठिकाणी सर्व कलासंचाचे सत्कार सोहळे होत होते. 'सांगत्ये ऐका' मधील 'काल राती मजसी झोप नाही आली' या लावणीचे चित्रीकरण हंसा वाडकरांवर करण्यात आले होते त्या नृत्याची आणि त्यातील गिरक्यांची रसिक मुक्त कंठाने प्रशंसा करीत पण हंसाबाईना त्यावेळी संकोच वाटे कारण त्यातील गिरक्यांची दृश्ये त्यांच्या डमी म्हणून लिलाबाईंवर चित्रित करण्यात आली होती. स्वतः हंसाबाईंनीच याचा गौप्यस्फोट 'रसतरंग' मध्ये केला.

'केला इशारा जाता जाता', 'देवा तुझी सोन्याची जेजुरी' सारखे तुफान यशस्वी चित्रपट केल्यानंतर १९६७ पासून त्यांनी चरित्र अभिनेत्रीची भूमिका करण्यास सुरवात केली. 'संत गोराकुंभार', 'चोरावर मोर' सारख्या चित्रपटातून खाष्ट कावेबाज खलनायिकेच्या भूमिका केल्या. हृषीकेश मुखर्जींच्या 'अशिर्वाद' मध्ये अशोककुमार यांच्याबरोबर नृत्यातून सवाल जवाब सादर करण्याची संधी त्यांना मिळाली.
चित्रपटाबरोबरच रंगभूमीवर 'सोळावं वरीस धोक्याच', 'कथा अकलेच्या कांद्याची' सारखी नाटकं त्यांनी सादर केली. अरुणा इराणींच्या गुजराथी नाटकामध्ये आणि संस्कृत मधील 'कालिदास' मध्येही त्यांनी भूमिका केल्या. एकुलत्या एक लहान मुलाचा अंत आणि घरगुती अडचणी यांच्यावर मात करीत त्यांनी आपली कारकीर्द फुलविली योग्य वेळ येताच त्यांनी या क्षेत्रातून सन्मानाने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि १९७९ पासून रंगभूमीवरील काम थांबविले आणि १९८३ पासून चित्रपटसृष्टीमधूनही निवृत्ती स्वीकारली.
आज त्या पुण्यामध्ये निवृत्त जीवन व्यतीत करीत आहेत परंतु समाजकार्याची अंतरीक ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही, अनेक दुर्लक्षित कलावंताना मानधन मिळवून देणे त्यांच्या विविध समस्या सोडविणे अशा कामाध्ये त्यांचा दिवस जातो. शासनाच्या 'रंगभूमी कर्मी' या संस्थेवर संचालक म्हणून काम पाहतात तर मध्यंतरी कॉसमॉस सहकारी बँकेच्या संचालिका म्हणूनही काम केले.
शाहिर सगनभाऊ स्मृती मंडळातर्फे दिला जाणारा 'शाहिर सगनभाऊ पुरस्कार' आणि जेजुरी देवस्थानकडून 'मल्हाररत्न' पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांना अनेक मान सन्मान मिळाले, नाव ,प्रसिद्धी यश कीर्ती आणि पैसा सर्व काही मिळाले पण इथल्या मातीशी जुळलेली नाळ त्यांनी कधी तुटू दिली नाही. मिळालेल्या यशाने त्या कधीच हुरळून गेल्या नाहीत जन्मभूमी जेजुरीचा त्यांना कधीही विसर पडला नाही किमान वर्षातून एकदा तरी खंडेरायाच्या दर्शनाला यायचे हा त्यांचा नेम ठरलेला आहे. शाहिर सगनभाऊ स्मृती कला मेळाव्याला त्यांची आवर्जून उपस्थिती असते. अशा या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंताला 'जेजुरी.इन' च्या वतीने मनाचा मुजरा.