रोशन सातारकर नुसतं नाव जरी ऐकल तरी ठसकेदार लावणीची आठवण व्हावी अस वलय या नावाभोवती होत. मूळचे रुख्मिणी नाव कालौघात केव्हा मागे पडले हे त्यांना हि सांगता येत नसे. साठ आणि सत्तरच्या दशकात सुलोचना चव्हाण आणि रोशन सातारकर हि दोन नाव लावणी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य करीत होती तो काळ म्हणजे लावणीचे सुवर्णयुग होते लावणी कधी तमाशाप्रधान चित्रपटामधून तर अल्बम द्वारे झळकत होती.त्यातही सुलोचनाबाई लावणी फक्त गातात पण रोशनबाई लावणी सादर करीत असत. रोशनबाईंची लावणीतील अदाकारी लोक कलेच्या प्रांतातील मैलाचा दगड ठरली. याबाबत घडलेली एक घटना आठवते ती एका मैफिलीत 'येऊ कशी ...' लावणी सादर करीत असताना डोक्यावर गाठोडं घेतल्याच्या प्रसंगात गाठोडं सदृश्य जवळ काहीच ना मिळाल्याने त्यांनी चक्क तबलेवाल्याचा डग्गा डोक्यावर घेऊन प्रसंगावधान राखले. त्यांची हि अदाच रसिकांना भावली व त्यांना उदंड लोकप्रियता मिळाली. तमाशा फडावरची लावणी माजघरात पोहोचविण्याचे श्रेय रोशनबाईनाच जाते. पुण्यातील आर्यभूषण थिएटर मध्ये खास महिलांसाठी प्रयोग सादर केले जायचे आणि तेही अगदी हाउसफुल होत असत. लोकप्रियता आणि रोशन बाई यांचे एक अतूट समीकरण होते, सत्तरच्या दशकात रोशन सातारकर संगीत पार्टीचे कार्यक्रम विदर्भ दौ-यावर होते त्याकाळात नागपूर मध्ये कार्यक्रम असताना रोशनबाईना पाहण्यासाठी रस्त्यावर इतकी अलोट गर्दी लोटलेली असे कि शेवटी बाईना बुरख्यामध्ये पोलीस बंदोबस्तात थिएटरवर नेण्याची जबाबदारी अनेकदा संयोजकांवर येत असे. अशी लोकप्रियता खचितच एखाद्या लावणी सम्राज्ञीला मिळाली असेल. ज्येष्ठ गायिका लतादीदी मंगेशकर यांनी रोशनबाईंच्या आवाजातील लावणीच्या कुतुहुला पोटी बाईना खास घरी निमंत्रण देऊन मैफिलीचे आयोजन केले होते.
रोशन बाईनी शृंगारिक लावण्यांबरोबर "माझ्या नव-यान सोडलीय दारू" सारख्या प्रबोधन करणा-या लावण्या तसेच उडत्या चालीवरील "डार्लिंग डार्लिंग" सारखी गाणी गायली. अखेरच्या काळामध्ये तमाशाचे बदल लेले स्वरूप पाहून त्यांचे मन विषण्ण होत असे. शासन दरबारी त्यांची दाखल घेतली नाही याची त्यांना खंत होतीच पण रसिकांकडून मिळालेले प्रेम त्यांना महत्वाचे वाटे.बुधवार दिनांक २१ सप्टेंबर२००५ रोजी जेजुरीमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि वयाच्या सातव्या वर्षापासून सत्तराव्या वर्षापर्यंत झळकणारे रोशन नावाचे लावणी युग अस्ताला गेले.